केवळ भारतापुरता जरी विचार करायचा झाला तरी भिक्षेची परंपरा अतिप्राचीन आहे, असे ठामपणे म्हणता येईल.
दत्त गोरक्ष आदिकरुनि I सिध्द भिक्षा मागती जनी II
नि:स्पृहता भिक्षेपासोनी I प्रगट होये II
(दासबोध १४ - २ - ५)
अष्टमा सिध्दीची उपेक्षा I करून घेतली योगदीक्षा II
घरोघरी मागे भिक्षा I महादेव II
(दासबोध १२-७-१९)
श्रीसमर्थ रामदास स्वामींनी भिक्षेचे महात्म्य सांगताना श्रीदत्तात्रय भगवान, श्रीगोराक्षनाथ, भगवान शंकर सुद्धा भिक्षा मागतात असा उल्लेख केला आहे. भारतामध्ये दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, श्री शंकराचार्याची संन्यासी परंपरा, रामदासी संप्रदाय त्याच बरोबर चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय यामध्ये भिक्षेची परंपरा दिसून येते. त्याच बरोबर बौध्दा मध्येही नि:स्पृह साधक भिक्षा मागतात, यावरूनच त्याना 'भिक्खू ' असे म्हंटले जाते. श्रीराम, श्री कृष्ण श्री गौतमबुद्ध या भारतात होऊन गेलेल्या महापूरुषांच्या चरित्रातही 'भिक्षा' परंपरेचे दर्शन आपल्याला होते. भारतामध्ये प्राचीन काळापासून गुरुकुलातील विध्यार्थी 'भिक्षा' मागत असत. ज्ञानार्जन करणाऱ्या, तप: स्वाध्याय करणाऱ्या स्नातक साधकांना 'भिक्षा' अर्पण करणे हे आपले कर्तव्यच आहे, अशी दृढ धारणा भारतीय समाजात होती व आजही बरयाच प्रमाणात ती टिकून आहे. आजही विविध संप्रदायातील मठ, गुरुकुले, सेवा उपक्रम भिक्षेच्या माध्यमातून चालतात. मात्र भिक्षा मागणे आणि स्वीकारणे या पद्धतीत थोडाफार फरक दिसतो.
भिक्षा - भिक नव्हे दीक्षा
संत परंपरेने स्वीकारलेली भिक्षा पद्धत हि एक दिक्षा आहे, व्रत आहे. भिक्षा म्हणजे भिक नव्हे. देह मन बुद्धी आणि परिस्थिती ने दुर्बल असणाऱ्या व्यक्तीने स्वार्थासाठी मागितलेली ती भीक. आणि देह, मन बुद्धी ने समर्थ व आत्मविकास साधून परिस्थितीवर जय असणाऱ्या ज्ञानी आणि विरक्त, विद्वान आणि विनम्र अशा व्यक्तीने 'परार्थ' आणि परमार्थ यासाठी म्हणजेच समाजहित व आत्मोन्नतीसाठी मागितलेली ती 'भिक्षा' असते. श्री समर्थ म्हणतात -
ब्राम्हणाची मुख्य दीक्षा I मागितली पाहिजे भिक्षा II
ओम भवति या पक्षा I रक्षिले पाहिजे II
भिक्षा मागणार्यासाठी यम - नियम
श्री समर्थांनी 'भिक्षा' हे समाज जागृती आणि समाज जोडणीचे साधन म्हणून वापरले. भिक्षा मागणारी व्यक्ती व्रतस्थ आणि निस्पृह असावी.त्या व्यक्तीचे आचार आणि विचार उन्नत असावेत, असे समर्थांना अपेक्षित आहेत. श्रीमत ग्रंथराज दासबोधात 'भिक्षानिरूपण ' समासात जे यम - नियम सांगितले आहेत ते मुळातून अभ्यासणे आवश्यक आहे. ते यम - नियम पुढीलप्रमाणे -
अखंड भिक्षेचा अभ्यास I तयास वाटेना परदेश I
जिकडे तिकडे स्वदेश I भुवनत्रयी II
(दासबोध १४-२-९)
स्वार्थाचा त्याग करून ज्ञानार्जन आणि ज्ञानदान करणाऱ्या व्यक्तीच्या उदर निर्वाहाची चिंता या 'भिक्षा' पद्धतीमुळे मिटते. साधक कोणीही एका व्यक्तीचा अथवा संस्थेचा उदर राहत नाही. 'भिक्षा' त्याला एक स्वतंत्र आणि स्वाभिमानी जीवन शिकवते. उदर निर्वाहाची साधने जमविण्यात व त्यांची विनियोग, व्यवस्था लावण्यात जाणारा वेळ व शक्ती वाचतात. याशिवाय उदार निर्वाह सारख्या अपरिहार्य गोष्टीची आणि समाज जागृतीच्या कार्याची सांगड घातली गेल्याने कार्यातील निश्चिती व सातत्य कायम राहते. भगवंताच्या भक्तीचा, भजनाचा प्रसार करून लोकांना भक्तीच्या माध्यमातून समाजाच्या तत्कालीन समस्यांची जाणीव करून देऊन शहाणे करणे हा 'भिक्षा' पद्धतीचा मुख्य उद्देश आहे
श्री समर्थ म्हणतात:
शहाणे करावे जन I पतित करावे पावन I
(याकारणे ) सृष्टीमध्ये भगवद्भजन I वाढवावे II
(दासबोध १४-६-३३)