सज्जनगड अत्यंत पवित्र वास्तू होय. या मठातच समर्थांची विश्रांतीची खोली पहावयास मिळते. आज ही वास्तू समर्थांचा मठ म्हणून ओळखली जाते. राज्याभिषेकेनंतर शिवछत्रपतीं समर्थांसमवेत येथे सुमारे दीड महिना राहिलेले आहेत. संभाजी महाराज देखील या मठात सुमारे दोन महिने राहिलेले आहेत त्यामुळे हा मठ म्हणजे श्रीसमर्थांचे शेजघर असा फलक या खोलीच्या दाराजवळ लावलेला दिसतो. विशेष म्हणजे समर्थांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही या शेजघरात अतिशय व्यवस्थीत जतन करून ठेवलेल्या पहावयास मिळतात. या खोलीतील मोठा पलंग खुद्द शिवछत्रपतींनी समर्थांना दिला होता. या पलंगावर समर्थ रामदासांचे एक चित्र आहे. हे चित्र प्रत्यक्ष समर्थांना पाहून त्यांचे शिष्य भीमस्वामी तंजावरकर यांनी काढलेले आहे. समर्थांचे हे चित्र अधिकृत असल्यामुळे त्यांच्या देहयष्टीची कल्पना या चित्रा वरून येते. शेजघरामध्ये एका बाजूला समर्थांनी वापरलेल्या चार वस्तू ठेवल्या आहेत १) छत्रपतींनी दिलेली कुबडी २) श्री दत्तात्रयांनी दिलेली कुबडी ३) वेताची काठी ४) सोटा. समर्थांनी शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडी मोठी रहस्यमय आहे. या कुबडी मध्ये तलवार आहे. त्याला गुप्ती असे म्हणतात. गडावरील सेवकांना विनंती केल्यास ते कुबडीतील गुप्ती आजही यात्रेकरूना काढून दाखवतात. शेजघरातच दोन भले मोठे हंडे आहेत. समर्थांचे लाडके शिष्य कल्याण स्वामी या हंड्यातून सामर्थांसाठी रोज परळी गावातून उर्वशी उर्फ उरमोडी या नदीचे पाणी घेऊन येत असत. या हंड्यांच्या बाजूला स्वतः मारुतीरायांनी दिलेली वल्कले असून ती समर्थांनी वापरलेली आहेत. समर्थांचा पाणी पिण्याचा पितळी लोटा आणि पिकदाणी पलंगा जवळ ठेवलेली आढळतात. कफाची व्यथा असल्यामुळे समर्थ विडा खात असत म्हणून ते पानाचा डबा व पिकदाणी वापरत असत. शेजघरात काट्यावर राममूर्तीचा ओटा आहे समर्थांनी पाच दिवस राममूर्तीची पूजा केलेली आहे. या पलंग समोर एक अग्नी कुंड आहे त्यावरून समर्थ सूर्योदय आणि सूर्यास्त समयी अग्नीची उपासना करत असत.